माझ्याबद्दल

थोडक्यात परिचय

सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी या निर्मल सिड्स प्रा. लि.च्या संचालिका आणि निर्मल इंटरनॅशनल स्कूल (CBSE), पाचोरा यांच्या अध्यक्षा आहेत. कृषी क्षेत्रातील शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक वारसा पुढे नेला. दृढ इच्छाशक्ती, नवकल्पनांची दृष्टी आणि प्रामाणिक कष्ट यांच्या जोरावर त्यांनी शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, महिलांना सक्षम करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेतीची साधने पोहोचवणे हे त्यांचे ध्येय आहे.

उद्योजिका म्हणून कार्य

कृषी पदवी घेतल्यानंतर, वैशाली सुर्यवंशी यांनी २००३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे ‘निर्मल गार्डन शॉपी’ सुरू करून उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली.

वडिलांच्या निधनानंतर, त्यांनी ‘निर्मल सीड्स प्रा. लि.’ या कंपनीच्या संचालकपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वात कंपनीचा विस्तार भारतभरातील २२ राज्यांमध्ये झाला असून, परदेशातही कंपनीची उत्पादने निर्यात केली जातात. कंपनीच्या ‘निर्मल जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळे’ची पाचोरा येथे स्थापना करण्यात आली, जी या क्षेत्रातील एक महत्त्वाची प्रयोगशाळा मानली जाते. निर्मल सीड्सच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

शिक्षण क्षेत्रातील योगदान

सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सन २०११ साली “निर्मल इंटरनॅशनल स्कूल” या रूपाने ज्ञानाचे एक छोटेसे रोपटे पाचोरा-भडगाव परिसरात रोवले. उद्देश होता-आपल्या भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्याचा.
विद्यार्थी कुशल अभियंता, प्रवीण डॉक्टर, तडफदार वकील किंवा प्रशासकीय सेवांमध्ये तेजस्वी IAS, IPS अधिकारी व्हावेत, एवढेच नव्हे तर त्यांचा सर्वांगीण विकास होऊन ते देशाचे सुजाण नागरिक बनावेत हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून या विद्यालयाची स्थापना करण्यात आली.

काळाच्या ओघात हे ज्ञानाचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात उच्च शिक्षण घेत आहेत, विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर कार्यरत राहून समाजाची सेवा करत आहेत. त्यांच्या यशामुळे केवळ शाळेचेच नव्हे, तर त्यांच्या पालकांचे आणि गावाचे नावही उज्ज्वल झाले आहे.

सामाजिक बांधिलकी

समाजातील गरजू, ग्रामीण व दुर्बल घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांना वडिलांकडूनच मिळाली. शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि ग्रामीण भागातील विकास उपक्रम या सर्व क्षेत्रांत त्यांनी सक्रिय सहभाग ठेवला आहे. कार्यातील पारदर्शकता, जबाबदारी आणि संवेदनशीलता यामुळे त्या स्थानिक तसेच जिल्हास्तरावर एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरल्या आहेत.

Scroll to Top